14 जून 2025 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचा गौरव
नंदुरबार, दि. 14 जून 2025 (शनिवार) –
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून आज नंदुरबार येथे आयोजित विशेष कार्यक्रमात लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य बजावत आहे. वेळोवेळी सिव्हिल ब्लड बँकेसह विविध रक्तपेढ्यांना आवश्यक रक्तदाते पुरवण्याचे कार्य संस्था समर्थपणे पार पाडते. त्यामुळे ही संस्था 'रक्तविर संस्था' म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांताराव डी. सातपुते सर व मा.श्री. संदीप पाटील सर, पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, नंदुरबार यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री. पंकज ठाकरे व सचिव श्री. राकेश चौधरी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
या गौरव समारंभाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगलसिंग पावरा सर, सिव्हिल हॉस्पिटलचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. श्यामकांत पाथरवट, डॉ. विभूती गावित (के.डी. गावित शिक्षण संस्था, संचालिका, नंदुरबार), डॉ.सौ.रमा वाडेकर (रक्त संक्रमण अधिकारी, सिव्हिल ब्लड बँक,नंदुरबार) मा.श्री.अभय चित्ते, नंददर्शन वृत्तपत्र उपसंपादक , यांच्यासह सिव्हिल ब्लड बँकेचा कर्मचारी वर्ग, आयोजक संस्था, आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुण्यांनी लोककल्याण संस्थेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. "रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, या कार्यात समर्पण व सातत्य राखणाऱ्या संस्थांचा सन्मान होणे गरजेचे आहे," असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
या वेळी उपस्थितांनी रक्तदानाच्या जनजागृतीसाठी अशा संस्थांनी पुढाकार घेतल्याचे अभिनंदन केले आणि अधिकाधिक तरुणांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.हा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.