बीजामृत,जीवामृत,दशपर्णी अर्क कडुनिंब अर्क




बीजामृतः

बीजामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य...

१) पाणी २० लिटर
२) देशी गाईचे शेण १ किलो
३) गोमूत्र किंवा मानवी मूत्र १ लिटर
४) जीवाणू माती मुठभर
५) गावरान गाईचे दूध १०० मि.ली.
६) कळीचा चुना ५० ग्रॅम
    
    हे बीजामृत रात्रभर भिजत ठेवावे, सकाळी काडीने डवळावे व बीजसंस्कार करावे. भाजीपाला किंवा पिकांचे जे बी पेरायचे आहे किंवा गादीवाफ्यावर टाकायचे आहे, ते फरशीवर किंवा जमिनीवर पसरावे. त्यावर बीजामृत शिंपडावे व हातांनी बी वरखाली करावे, जेणेकरून बियावर बीजामृताचे अस्तर चढेल. त्यानंतर बी सावलीत सुकवावे व पेरावे. भाजीपाल्याची रोपे, फळझाडांची रोपे लावण्याआधी बीजामृतात मूळ्या बुडवाव्या. पाच मिनटे ठेवावे व लावणी करावी. केळीचे कंद बुडवून लावावे. ऊसाच्या कांड्या बांबूच्या टोपल्यात टाकून ते टोपले (घमेलं ) बीजामृतात बुडवावे व नंतर लागण करावी. म्हणजेच जे पेरायचं / लावायचं आहे ते सर्व बीजामृतात बुडवावे लागते.


जीवामृतः

जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य...

१) देशी गाईचे शेण १० किलो (एक घमेलं)
२) देशी गाईचे गोमूत्र वा मानवी मूत्र ५ ते १० लिटर
३) काळा किंवा लाल किंवा पिवळा गूळ २ किलो
4) कडधान्याचे पीठ २ किलो
५) जीवाणू माती मूठभर
६) पाणी २०० लिटर

    हे द्रावण दोन ते सात दिवस आंबवावे. दिवसातून तीन वेळा काडीने ढवळावे, सावलीत ठेवावे व दर पाण्यासोबत वाहत्या पाण्यातून एका एकराला द्यावे.

दशपर्णी अर्क :


        दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कडूलिंब पाला ५ किलो, घानमारी (एलतार, फुलारी, टणटणी) पाला २ किलो + निरगुडी पाने २ किलो + पपई पाला २ किलो गूळवेल २ किलो + सीताफळ पाला ३ किलो + करंज पाला २ किलो + लाल कन्हेरी २ किलो + रुई (ऋश्चिक) पाला २ किलो मोगली एरंड पाला २ किलो + कारल्याचा पाला २ किलो + पांढरा धोतरा पाला २ किलो + तिखट हिरवी मिरची २ किलो (ठेचून) लसूण पाव किलो (ठेचून) + देशी गाईचं शेण ३ किलो गोमूत्र ५ लिटर + २०० लिटर पाणी.
     हे द्रावण १ महिना आंबवावे. दिवसातून तीन वेळा काडीने ढवळावे, गाळून साठवावे. हे मूळ औषध झाले. ह्यात सांगितलेला कारलीचा पाला किंवा धोतरा पाला हे दोन्ही पाले वरील इतर दहा पाल्यापैकी जे उपलब्ध झाले नाही याला पर्याय म्हणून दिला आहे. सर्व प्रकारच्या कीडरोगांसाठी या अर्काची फवारणी उपयुक्त आहे.

कडुनिंब अर्क :-


    कडुनिंबाच्या बिया किंवा तेलाचा वापर अनेक किडीच्या नियंत्रणासाठी केला जातो. त्यासाठी ५% निंबोळी तेल किंवा निंबोळी अर्क वापरावा. निंबोळी तेलासोबत गोमुत्राचा वापर केल्यास त्याचा परिणाम चांगला होतो. प्रती लिटर पाण्यात ५ मि.ली. निंबोळी तेल व २५ मि.ली. गोमुत्र मिसळून फवारणी करावी.

कडूनिंब अर्क करण्याची पद्धत :

    
    कडूनिंबाचा वापर वनस्पतीजन्य किटकनाशक म्हणून होतो. कडूनिंबामध्ये अॅझाडिरॅक्टिन, निंबीन, निंबिडीन, मॅलॉद्रियाल हे महत्त्वाचे घटक आहेत. अर्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

१) ५ किलो साफ करून वाळवलेल्या निंबोळ्या
२) कुटण्याचे साधन
३) १० लिटर पाणी
४) गाळण्यासाठी पातळ कापड
५) २०० ग्रॅम साबणाचा चुरा किंवा कपडे धुण्याची पावडर

अर्क तयार करण्याची पद्धत :

१) प्रथम ५ किलो निंबोळ्या साफ्फ्र करून घ्या.
२) फवारणीच्या अगोदरच्या दिवशी निंबोळी बारीक कुटून द्या व ही
भुकटी १० लि. पाण्यात भिजत ठेवा.
३) सकाळी हा अर्क फडक्याने गाळून घ्या.
४ ) यासाठी कपड्याची पुरचुंडी पिळून घ्या. ज्याद्वारे जास्तीत जास्त अर्क निघेल.
५) गाळलेल्या निंबोळी अर्कात जास्तीत जास्त पाणी टाकून १०० लि. द्रावण बनवा. आता ५% निंबोळी अर्क तयार झाला.
    
    हा अर्क फवारणीनंतर पाण्यावर योग्य रितीने पसरवा व टिकून राहण्यासाठी २०० ग्रॅम साबणाचा चुरा किंवा कपडे धुण्याची पावडर अर्धा लिटर पाण्यात मिसळा व हे मिश्रण निंबोळी अर्काच्या द्रावणात टाकून मिश्रण चांगले ढवळा. अशारितीने तयार केलेला ५% निंबोळीचा अर्क किटकांचा प्रादूर्भाव दिसताच फवारावा. निंबोळी अर्कासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी केलेल्या किटकनाशकांची अर्धी मात्रा मिसळल्यास त्याचे नियंत्रण अधिक चांगले करता येते. निंबोळी अर्कासोबत एन.पी.व्ही. वापरल्यास सुद्धा बोंडअळीचे परिणामकारक नियंत्रण होऊ शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.